आशाताई बच्छाव
पुणे येथील पुस्तक महोत्सवात छोट्या लेखिकेने वेधले वाचकांचे लक्ष
—————————————-
एका दिवसात शंभर पुस्तकांची विक्री @ माजी मंत्री विनोद तावडे,ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले आराध्या नंदकरचे कौतुक
—————————————-
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) आराध्या राजीव नंदकर या अवघ्या ११ वर्षीय छोट्या लेखिकेच्या सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब या मोठया पुस्तकाने पुणे येथील पुस्तक महोत्सवात वाचकांचे लक्ष वेधले असून एका दिवसात शंभर पुस्तकांची विक्री झाली आहे. दरम्यान, राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्टॉलला भेट देऊन कु.आराध्या नंदकर या छोट्या लेखिकेचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय बुक न्यास (NBT) मार्फत फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे आयोजित केलेल्या पुणे बुक फेस्टिव्हल मध्ये या छोटया लेखिकेने लिहिलेल्या सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब (Sara Parker & The Magical Orb) या पुस्तकाच्या एका दिवसात १०० पेक्षा जास्त प्रती विकल्याचा विक्रम झाला आहे.
त्यामुळे पुणे बुक फेस्टिवल मध्ये आराध्या राजीव नंदकर या छोट्या लेखिकेवर मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.या कामगिरीबद्दल राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार विजेते आणि ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनीही स्टॉलला भेट देऊन तिचे अभिनंदन केले. आराध्या राजीव नंदकर ही ११ वर्षाची छोटी लेखिका असून तिने वय वर्ष १० असतांना सारा पार्कर अँड द मॅजिकल ओरब (Sara Parker & The Magical Orb) हे १४४ पानांचे पुस्तक (Novel) लिहिले आहे. पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये अनुराध्या पब्लिकेशन मार्फत तिचे हे पुस्तक स्टॉल क्रमांक C-23 मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.