आशाताई बच्छाव
उद्री प.दे. येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवारी भव्य पालखी सोहळा !
∆ सोमवारी महाप्रसाद व कुस्त्यांची भव्य दंगल
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे श्रीमल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त शनीवार पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी रात्री जागरण तर रविवारी सायंकाळी भव्य पालखी सोहळा आणि सोमवारी सकाळी महाप्रसाद तर दुपारी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक कृष्ण 14 दर्श अमावस्या दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारी रात्री श्रीमल्हारी म्हाळसाकांत खंडोबा यात्रेनिमित्त जागरण करण्यात येणार असून कार्तिक अमावस्या दिनांक एक डिसेंबर 2024 रोज रविवारी सायंकाळी भव्य पालखी सोहळा पालखीचे मानकरी यशवंत पाटील बोडके यांच्या घरी श्रीमल्हारी माळसाकांत खंडोबा यांचे पालखीत स्थापना, पूजन व आरती करून गावातील प्रमुख मार्गावरून हा पालखी सोहळा वाजत गाजत बेल -भंडाराची, खोबराची उधळण करीत, फटाक्यांच्या अतिषबाजीत श्री खंडोबा मंदिर येथे पोहोचणार आहे. श्री खंडोबा मंदिर येथे श्री मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा मूर्तीचे विधिवत पूजन व आरती मानकऱ्यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
मार्गशीर्ष शुक्ल एक दिनांक 2 डिसेंबर 2024 सोमवारी सकाळी श्री खंडोबा मंदिर येथे यात्रा संयोजन समितीच्या व गावकऱ्यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी कुस्त्यांची भव्य दंगल यात्रा संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली असून कुस्त्यांच्या डावाचा मान सुधाकर गुरुजी गनलेवार यांच्या घरून काढण्यात येणार आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यात्रेतील जागरण,पालखी सोहळा, महाप्रसाद, कुस्तीच्या दंगलीत सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी असे आवाहन यात्रा संयोजन समिती व उंद्री प.दे. गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.