आशाताई बच्छाव
नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -जागे रहा, ड्रोन घेऊन
चोर आलेत. रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्यानं पाहणी करुन मध्यरात्री चोर येतील, अशा अफवा ग्रामीण भागांत अलीकडे खूपच ऐकायला मिळत आहेत. (दि. २७) रात्री नऊच्या सुमारास तर कहरच झाला. सोनई – कांगोणी रस्त्यालगतच्या शेटे पाटील वस्ती, जगताप वस्ती, वडघुले वस्ती, मुथा डीपी आणि मुथा फॉर्म परिसरात तसंच मुळा कारखाना पानसवाडी परिसरात ड्रोनच्या अफवांचीच चर्चा सुरु होती. यामुळे रात्री उशिरापर्यंत महिला आणि पुरुष रस्त्यावर उभे राहून चर्चा करत होते. सोनई पोलिसांची जीप रात्री उशिरापर्यंत गस्त घालत होती. घाबरु नका, असं आवाहन पोलीस करत होते.
यासंदर्भात सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘ड्रोन आणि चोरीचा काहीही संबंध नाही.
ड्रोन कंपन्यांचा सर्वे सुरु आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पोलिसांची रात्रीची गस्त नियमितपणे सुरु आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये’.
पिंपळाचं पान गळालं, असं कोणी सांगितलं, तर कोणी कोणी पिंपळगाव जळालं, असं अर्धवट ऐकून अफवा पसरविण्याचं काम करतात. अर्थात अफवा पसरवणं हा खरं तर फौजदारी गुन्हा आहे. मात्र अफवा कोण पसरवतं, हेच स्पष्टपणे माहीत नसल्यानं गुन्हा नक्की कोणाविरुद्ध दाखल करायचा, हाच खरा प्रश्न आहे