आशाताई बच्छाव
देवळा,(भिला आहेर तालुका प्रतिनिधी):: हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा शुर योद्धा तथा पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालूसरे यांच्या स्मरणार्थ जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने उमराणे येथील खंडोबा मंदिर ते पोहिनाला वस्तीपर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले .
उमराणा मावळखोऱ्यात जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने प्रत्येक क्षेत्रात लोककल्याणकारी उपक्रम मागील तीस वर्षापासून अखंडपणे राबविले जात आहेत . हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात , सरदार , किल्लेदार , मावळे यांनी योगदान दिले आहे . इतिहासातील उपलब्ध माहिती नुसार अशा शूर योध्यांच्या कार्याचा परिचय आजच्या तरुण पिढीला करून द्यावा , या उद्देशाने या वर्षी पारगड किल्ल्याचे किल्लेदार रायबा तानाजी मालूसरे यांच्या स्मरणार्थ परसूल नदीतिराजवळील खंडेराव मंदिरापासून ते पोहिनाला वस्ती पर्यंतच्या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यात आले .
गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना गावात येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता , विशेषतः वयोवृद्ध , आजारी व्यक्ती तसेच शालेय विद्यार्थी यांना होणारा त्रास याची दखल घेऊन मित्रमंडळाने सदर रस्ता दुरुस्त करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .