आशाताई बच्छाव
परळीत चेंबरी विश्रामगृह जवळील उड्डाण पुलावरील झाडे झुडपे ठरताहेत जीवघेणी; झाडांची तोडणी त्वरित करा- अँड.मनोज संकाये
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि: १६ जून २०२४
परळी शहरात बीड – परळी मुख्य रस्त्यालगत असलेल्या चेंबरी विश्रामगृहाजवळील उड्डाण पुलावरील झाडेझुडपे वाढल्याने तेथे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ही झाडे झुडपे नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिका प्रशासनाने त्वरित झाडे व झुडपे यांची तोडणी करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहरात सर्वात जुने असलेले चेंबरी विश्रामगृह त्याच्याजवळ उड्डाणपूल आहे व जवळच थर्मल पावर स्टेशन आहे. त्या ठिकाणाहून जिल्ह्याकडे आणि जिल्ह्याहून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. थर्मल पावर स्टेशनचे कर्मचारी त्या मार्गावरून आपल्या नोकरीसाठी जात असतात त्याला लागून पुढे आय टी आय कॉलेज आहे. या कॉलेजला विद्यार्थी व विद्यार्थिनी याच मार्गाचा अवलंब करतात. हा मार्ग झाडे व झुडपाने व्यापला असल्यामुळे समोरील वाहने दिसत नाहीत परिणामी त्या ठिकाणी आत्तापर्यंत भरपूर अपघात झालेले आहेत व भविष्यातही अपघाताचे प्रमाण वाढू शकते. नगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या ठिकाणची असणारी झाडे व झुडपे ही तोडली होती परंतु दोन वर्षानंतर तेथे जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित झाडेझुडपे तोडावीत अशी मागणी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.