Home नांदेड आज मतमोजणी ; 23 उमेदवारांचे भवितव्य आजच ठरणार

आज मतमोजणी ; 23 उमेदवारांचे भवितव्य आजच ठरणार

53
0

आशाताई बच्छाव

1000425218.jpg

आज मतमोजणी ; 23 उमेदवारांचे भवितव्य आजच ठरणार

· प्रशासनाची जय्यत तयारी
· सकाळी ८ पासून सुरु होईल मतगणना
. पहिल्या फेरीचा निकाल 11 वाजेपर्यंत
· मतमोजणी परिसरात चोख बंदोबस्त
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 3 :– १६ – नांदेड मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी अठराव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण जाणार याचा निवाडा उद्या मतमोजणी प्रक्रियेद्वारे होणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी केली असून आज दोन्ही निवडणूक निरीक्षक तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल कळेल तर सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निकाल येईल अशी शक्यता आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. नांदेड जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्न, समीरकुमार ओ. जे. यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवडणूक निरीक्षकासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

८० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

१६ मार्च पासून उदया ४ जून असे एकूण ८० दिवस प्रशासन निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त होते. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍यात आली. नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी येथे पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन केले होते. विविध मान्यवरांनी या केंद्राला भेटी दिल्या. महिला सखी मतदान केंद्र, वजीराबाद नांदेड येथे गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले होते. तसेच प्रशासनाने केलेली तयारी आणि आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी २६ एप्रिल 2024 रोजी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला. यात महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान झाले.

आज स्ट्राँग रूम उघडणार

या मतदानाच्या मतपेट्या तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉगरूममध्ये २५ एप्रिलपासून ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सिलबंद करण्यात आले आहे. यांची 24 तास इनकॅमेरा निगराणी ठेवण्यात आली होती. उदया सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे.

२३ उमेदवाराचे भवितव्य आज ठरणार

लोकसभेसाठी विविध पक्ष व अपक्ष म्हणून लढलेल्या 23 उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.यामध्‍ये चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्‍ह- हात,चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)- चिन्‍ह कमळ, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) चिन्‍ह- हत्‍ती, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) चिन्‍ह-शाळेचे दप्‍तर, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) चिन्‍ह-शिट्टी , कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) चिन्‍ह-शिवण यंत्र, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) चिन्‍ह-खाट, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) चिन्‍ह-ऑटो रिक्‍शा, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) चिन्‍ह-गॅस सिलेंडर, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) चिन्‍ह-जहाज. तर अपक्षांमध्‍ये कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) चिन्‍ह-फुगा, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-माईक, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) चिन्‍ह-कपाट, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) चिन्‍ह-टेबल, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) चिन्‍ह-ऊस शेतकरी, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-एअर कंडिशनर, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) चिन्‍ह-हिरा, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) चिन्‍ह-सफरचंद, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) चिन्‍ह–पेन ड्राईव्‍ह, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) चिन्‍ह-रोड रोलर, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) चिन्‍ह-बेबी वॉकर, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) चिन्‍ह-पेनाची निब सात किरणांसह, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) चिन्‍ह-बांगड्या यांचा समावेश आहे.

तळ व पहिल्या माळ्यावर प्रत्येकी ३ केंद्र
तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या तळमजल्यावर भोकर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे तर पहिल्या मजल्यावर नायगाव,देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळ्यावरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय थाटण्यात आले असून या ठिकाणावरून सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचा एकत्रित फेरी निहाय निकाल निवडणूक आयोगाला तसेच जनतेला कळविण्यात येणार आहे.

अतिरिक्त मंडप व पायाभूत सुविधा

याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा पूर्णतः कार्यरत झाल्या आहेत. मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणी कक्षामध्ये आवश्यक ती बैठक व्यवस्था तसेच कर्मचारी व मतमोजणी एजंट यांच्यासाठी उभी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच खानपानाची व्यवस्था देखील प्रशासनाने केली आहे.

स्ट्रॉंग रूम परिसरात बंदोबस्त
शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीनस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात असून प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असून मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जात आहे. उद्या सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे.जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत.. तेवढेच पोलीस अधिकारी -कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.

सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते. यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.

प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी
नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम
प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात. यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी 100 कर्मचारी कार्यरत असतात. आज या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात रंगीत तालीम पूर्ण केली आहे सकाळी सहा वाजता हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर पोहोचणार आहेत.

नांदेडमध्ये २६ फेऱ्याची मतमोजणी
नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो. जितके मतदान केंद्र तितके गुणेला १४ टेबल त्यामुळे उत्तर नागपूरला 23 तर सर्वात अधिक देगलूर नांदेडमध्ये २६ फेऱ्या होतील. साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा ते ११ पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

मोबाईल नेण्यास प्रतिबंध

मतमोजणी केंद्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय माध्यम प्रतिनिधी असो किंवा लोकप्रतिनिधी असो कोणालाही केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी आपले मोबाईल सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लाऊडस्पिकर्सची व्यवस्था
शासकीय तंत्रनिकेतन परिसरात रस्त्यावर ऐकू येईल अशा पद्धतीने लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना देखील या परिसरात लाऊड स्पीकरवर फेरीनिहाय निकाल ऐकता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरात नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.

माध्यम केंद्राची उभारणी

नागरिकांना कळावे यासाठी निवडणूक आयोगाने ज्या पत्रकारांना प्रवेशिका दिल्या आहेत अशाच पत्रकारांना या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत उद्याच्या मतमोजणीचे वृत्तांकण होणार आहे. महादेव दालमिलकडील गेटमधून हा प्रवेश पत्रकारांना दिला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाड्यांची पार्किंग करता येणार आहे.

Previous articleबागलाण तालुक्यात शिताफळ  लागवडीस पोषक  वातावरण 
Next articleमतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक समीरकुमार ओ.जे नांदेडमध्ये दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here