राजेंद्र पाटील राऊत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चा संबंध दाऊदशी जोडला..!
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज चांगलच गाजलं. कारण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून आणि वक्फ बोर्डावरील सदस्याचे कसे दाऊशी संबंध आहेत, हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला. याशिवाय, सरकारी वकील अॅड. चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने विरोधी पक्ष भाजपाने सभात्यागही केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ मूळातच जो पेनड्राईव्ह मी दिला. त्यामध्ये स्पष्टपणे कट दिसतोय. कशाप्रकारे गिरीश महाजनांकडे रेड करायची. त्या रेडमध्ये काय काय ठेवायचं आणि हे घडलय. जे त्या सीडीमध्ये दिसतय ते सगळं घडलय.
एवढच नाही तर अनेक प्रकरण त्यामध्ये आहेत, ती सगळी घडली आहेत. प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या नेत्याचं, मंत्र्यांचं नाव हे वकील घेत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी कशी करणार, त्यांच्यावर दबावच येणार आहे.
म्हणून आम्ही अतिशय स्पष्टपणे ही मागणी केली होती, की हे प्रकरण सीबीआयला द्यायला पाहिजे. आज खरंतर उत्तर देताना वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरब्बी व्यक्ती देखील, सारखा अडखळत होता. याचं कारण त्यांना मनातून माहीत होतं की आपण जे उत्तर देतोय ते चुकीचं देतोय.
जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे. आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत. ही सगळी चौकशी सीबीआयला गेली, तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे.”