राजेंद्र पाटील राऊत
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून राजकीय भूकंप..?
मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
वाईन विक्रीचा निर्णय विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केल्यानंतर त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर दिलं आहे. “वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजपा देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे”, .
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती. त्यावरून देखील अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. “सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करणारा आहे असे बोंबलणे म्हणजे स्वत:च्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे. बरं देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात बसून या निर्णयास विरोध करावा हे आश्चर्य म्हणावे लागेल. ज्या राज्यात फक्त दारूचेच धबधबे भाजपाच्या नेतृत्वात वाहत आहेत, त्याचे फडणवीस प्रभारी आहेत. भाजपाशासित सर्वच राज्यांत दारू विक्रीसंदर्भात मवाळ धोरण का स्वीकारले आहे, याचाही खुलासा महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी करायला हवा”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
राज्यातील १००० चौरस फूटांपेक्षा जास्त आकाराच्या सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर त्यावरून मोठं राजकारण पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा राज्यातल्या सर्वच भाजपा नेत्यांनी या निर्णयावरून टीका केली असताना आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाच्या या विरोधाचा समाचार घेताना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. राज्यातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.
“मोदी सरकारनेच नाशिक या वाईन कॅपिटलला विशेष दर्जा दिला आहे. केंद्र सरकार वाईन उद्योगाला बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक योजना केंद्रानं आखल्या आहेत. नाशिकच्या वाईनचं ब्रँडिंग करण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. नाशिकमध्ये वाईन टुरिझमला प्राधान्य मिळावे ही केंद्राची योजना आहे. मग आता केंद्र सरकारला हिंदुस्थानचेच मद्यराष्ट्र करायचे आहे असे महाराष्ट्रातील भाजपावाले बोंबलणार आहेत का?” असा सवाल देखील अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये दारूविक्रीला परवानगी दिल्यावरूनही शिवसेनेने टोला लगावला आहे. “मध्य प्रदेशात भाजपाचीच सत्ता आहे. तिथल्या सरकारने तर होम बार लायसन्सला परवानगी दिली आहे. ज्यांचं वार्षिक उत्रन्न एक कोटी रुपये आहे, ते घरीच बार उघडू शकतील. घरात मद्याची साठवणूक मर्यादाही वाढवली आहे. . आता महाराष्ट्रातील भाजपाची मंडळी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशलाही बेवड्यांना समर्पित करणार का?” असा सवाल देखील शिवसेनेनं उपस्थित केला आहे.