आशाताई बच्छाव
वाशिम शहरात सुरु असलेल्या अवैध व अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करा
शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख गजानन भांदुर्गे यांची मागणी; मुख्याधिकार्यांना निवेदन
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- शहरातील खामगाव जीनसह इतर भागात सरकारी व एनए नसलेल्या जागांवर धनदांडग्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात अवैध व अनाधिकृतपणे बांधकामे सुरु आहेत. या बांधकामासाठी नगर परिषदेची कोणतीही पुर्वपरवानगी घेण्यात आली नाही. मात्र या प्रकाराकडे नगर परिषदेच्या यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील अवैध बांधकामे तात्काळ थांबवून संबंधीतांसह कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन विठोबा भांदुर्गे यांनी केली आहे. याबाबत १८ फेब्रुवारी रोजी नगर परिषद मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, गेल्या काही काळापासून वाशिम नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. विशेषतः सरकारी जागांवर तसेच एन.ए. न झालेल्या भूखंडांवर काही धनाढ्य व्यक्तींनी नगर परिषदेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन आणि नगर परिषद प्रशासनाचा काही अप्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबत जनतेमध्ये संशय व्यक्त होत आहे.
या अनधिकृत बांधकामांमुळे केवळ नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होत नसून, महाराष्ट्र शासनाचाही महसूल बुडत आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिक आणि झोपडीधारकांना जर असेच बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, तर प्रशासन त्यांच्यावर तातडीने कारवाई करते. मात्र, मोठ्या धनाढ्य लोकांच्या बांधकामांकडे प्रशासन डोळेझाक करते यामध्ये पाटणी चौक ते जुना अकोला नाका, सिंधी कॉलनी आणि नगर परिषद कॉम्प्लेक्स समोरील (जुने खामगाव जिन) भागांत मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम सुरू आहेश या ठिकाणी अद्याप कोणतीही अधिकृत बांधकाम परवानगी देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून २४ तासांच्या आत या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भांदुर्गे यांनी दिला आहे.