आशाताई बच्छाव
अंबाजोगाई तालुक्यातील ३४ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून केला खून
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/अंबाजोगाई दि ०१ नोव्हेंबर २०२४ अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिपळा येथील सचिन शिवाजी तिडके वय ३४ वर्षे या तरुणाचा दगडाने डोकं ठेचून खून केल्याची घटना दि. ३० ऑक्टोबर बुधवार रोजी घडली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून ऊसतोड मजूर पुरविण्यासंबंधीत झालेल्या आर्थिक व्यवहारातून यमराज राठोड या युवकाने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सचिनच डोकं दगडाने ठेचून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सचिनचे वडील शिवाजी सिताराम तिडके (रा. भोगलवाडी ता. धारूर जिल्हा. बीड) यांच्या फिर्यादीवरून सचिन मागील दोन वर्षापासून त्याची सासरवाडी डोंगर पिंपळा येथे राहत होता. तेथील स्थानिक व्यक्तीची शेती बटाईने करत तो ऊसतोड मुकादम व ट्रॅक्टर घेऊन साखर कारखान्याला ऊस तोडणी साठीही जात असे. यमराज राठोड हा युवक सचिनकडे मागील एक महिन्यापासून कामाला होता. तो सचिन सोबत ऊस तोडणीला देखील जाणार होता. परंतु नंतर त्याची सचिन सोबत जाण्याची इच्छा नव्हती. दि. २९ ऑक्टोबर मंगळवार रोजी तीन ऊसतोड मजूर देतो म्हणून तो सचिनला घरातून घेऊन गेला. त्यानंतर यमराज त्याचे दोन साथीदार हे सचिनला घेऊन तो बटईने करत असलेल्या शेतात गेले. तिथे त्या तिघांनी सचिनला भरपूर दारू पाजली. यावेळी ऊसतोड मजूर पुरविण्यासंबंधीत झालेल्या आर्थिक वादारातून त्यांनी सचिनचं डोकं दगडाने ठेचून खून केला.
हातातील धाग्यावरून पटली ओळख
सचिनचा मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून यमराजने दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रूप केला. काही ग्रामस्थांना सचिनचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याची खबर त्यांनी तात्काळ अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वडील शिवाजी तिडके, सचिनची पत्नी आणि भावांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेहाच्या अंगावरील कपडे उजव्या हातातील धाग्यावरून तो सचिनच असल्याची खात्री त्याच्या कुटुंबीयांनी पटवली. ऑटोरिक्षा चालकाच्या कॉलची झाली मदत सचिन, यमराज अन्य तीन पुरुष आणि एक महिला हे परळी येथून अंबाजोगाईत एका ऑटोरिक्षात बसून आले होते. पैसे कमी असल्यामुळे उर्वरित ५० रुपये उद्या देऊत असे रिक्षा चालकास सांगितले. त्यानंतर रात्री ८:०० वाजताच्या सुमारास दुसऱ्या रिक्षातून ते धावडी फाटा येथे आले. यावेळी सचिनने ऑटोरिक्षा चालकास उद्याचे परळीचे भाडे देतो असे सांगून स्वतःचा मोबाईल नंबर त्याला दिला. दरम्यान सचिनच्या साडूचा मुलगा आकाश हा त्याला घेण्यासाठी अंबाजोगाई बस स्थानकावर आला होता. यावेळी सचिनने सोबत चौघे असून त्यांना गावाकडे घेऊन येत असल्याचे सांगितले. यावेळी आकाश सचिनचा मोबाईल घेऊन पुढे निघून गेला. त्यानंतर आरोपींनी सचिनचा खून केला. मात्र एका ऑटोरिक्षा चालकाने ५० रुपये उधारी घेण्यासाठी आणि दुसऱ्याने परळीच्या भाड्याबाबत चौकशी करण्यासाठी फोन केल्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या लक्षात आला. त्यातच खुनाच्या घटनेपासून यमराज देखील गायब होता. त्यामुळे त्याचा या खुनात सहभाग असल्याची खात्री पोलिसांना पटली.
तिन्ही आरोपी फरार
शिवाजी तिडके यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात यमराज आणि अन्य अनोळखी दोन व्यक्तींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेपासून तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे पुढील तपास करीत आहेत.