आशाताई बच्छाव
ज्येष्ठांना मिळेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आधार.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 10 सप्टेंबर: राज्यातील 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ज्येष्ठांना वयोश्रीचा आधार मिळणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत 65 वर्षे वय किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक पात्र आहेत. आधार कार्ड असावा किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्ग इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी मतदान कार्ड सोबत जोडावे. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावे. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व दोन वेगवेगळे घोषणापत्र सोबत जोडावे. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे सोबत जोडावे.
योजनेंतर्गत लाभाचे स्वरूप
पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे 3 हजारापर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलरचा समावेश आहे. जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांनी क्यु-आर कोडमध्ये अर्ज स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड या कार्यालयात 20 सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे संपर्क साधावा.