
आशाताई बच्छाव
गोदा समृध्दी कृषी महोत्सवाचे आयोजन
जालना, दि.27(जिमाका) : प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्यावतीने पाच दिवसीय आझाद मैदान, जालना येथे दि. 27 ते 31 मार्च या कालावधीत गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आज महिला शेतकऱ्यांच्या हस्ते फीत कापुन गोदा समृद्धी कृषी महोत्सव सर्वांसाठी खुला करण्यात आला असून, 31 मार्च, 2025 पर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले असणार आहे.
या महोत्सवासाठी आत्माचे प्रकल्प संचालक जे पी शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आ.र कापसे, उपविभागीय कृषि अधिकारी, राम रोडगे, प्रशांत पवार, आत्माचे प्रकल्प उप संचालक अमोल आगवान, दत्तात्रय सुर्यवंशी यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांची उपस्थिती होती.
कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवातून शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रातील पारंपारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते.
सदरील महोत्सवात 200 स्टॉलमध्ये विविध विभागाच्या योजनांचे प्रचार प्रसिद्धीसाठी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी व डाळी विक्रीसाठी आणल्या आहेत. कृषी निविष्ठा, कृषि औजारे, बचत गटांच्या स्टॉलमध्ये संधी देऊन विक्रीसाठी दालन आजपासून खुले करून देण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-