आशाताई बच्छाव
BIG BREAKING! गुप्तधनाच्या लालसेसाठी पाच वर्षीय मुलीच्या नरबळीचा कट ! – भोंदू बाबाचा धक्कादायक पर्दाफाश धामणगावचा ‘ढोंगी’ अखेर गजाआड ! पोलिसांनी खोदून काढला सत्याचा खड्डा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- धामणगाव धाड गुप्तधनाच्या हव्यासापोटी पाच वर्षीय निष्पाप मुलीचा नरबळी देण्याचा कट रचणाऱ्या भोंदू बाबाचा पोलिसांनी
चोख तपास करून पर्दाफाश केला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांच्या आत्महत्येच्या तपासात ही थरारक माहिती उघड झाली. पोलिसांनी या प्रकरणी भोंदू बाबा गणेश लोखंडे याला अटक केली असून त्याने कबुली जबाब दिला आहे.
पोलिसांच्या सखोल तपासातून उघड झाला नरबळीचा कट
३ मार्च रोजी ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात एक चिठ्ठी
मिळाली. त्यातून धामणगाव येथील भोंदू बाबा गणेश लोखंडे याने दिलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ गणेश लोखंडे याला अटक करून जबरदस्त तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आले.
गणेश लोखंडे याने धामणगाव येथील एका शापित घरात मोठे गुप्तधन असल्याचा अफवा पसरवून ते घर विकत घेतले. त्या घरात २० फूट खोल खड्डा खणून तो नरबळीच्या तयारीत होता. विशेष म्हणजे, या नरबळीसाठी त्याने ज्ञानेश्वर आहेर यांच्या पाच वर्षीय मुलीची निवड केली होती. ती मुलगी ‘पायाळू’ जन्मली आहे, त्यामुळे ती गुप्तधन मिळवण्यासाठी आवश्यक असल्याचा अंधविश्वास त्याने बाळगला होता.
मुलीवर हक्क सांगण्यासाठी पाठवली होती वकिलामार्फत नोटीस !
लोखंडे याने आहेर कुटुंबीयांना मानसिक त्रास देण्यासाठी त्यांची मुलगी माझीच आहे, ती मला द्या असे सांगितले होते. एवढेच नाही, तर त्याने वकिलामार्फत ज्ञानेश्वर आहेर यांना मानहानीची नोटीसही पाठवली. या सततच्या छळामुळे मानसिक तणावात येऊन ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली.
पोलिसांनी खोदून काढला सत्याचा खड्डा!
भोकरदन पोलिसांनी आरोपीच्या जुन्या घराची झडती घेतली असता दोन बाय तीन फूटाचा २० फूट खोल खड्डा आढळून आला. या खड्यातच नरबळी देण्याचा त्याचा कट होता. घटनास्थळी पोलिसांना इलेक्ट्रिक ब्रेकर, खड्डा खोदण्यासाठी लागणारे साहित्य आणि ‘गोरख तंत्र’ नावाचे
तांत्रिक साधनेचे पुस्तक सापडले.
आरोपी न्यायालयीन कोठडीत, पोलिसांचा जनतेला इशारा
गणेश लोखंडे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याची जालना कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी पडू नये, कोणत्याही तांत्रिक, तांत्रिक साधनांच्या गंड्यात न अडकता संशयास्पद हालचाली पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, असे आवाहन टीम युवा मराठा व पोलीस करत आहे