आशाताई बच्छाव
जालना ड्रायपोर्टच्या उभारणीस गती देण्यासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी
जालना, ६ मार्च २०२५ – जालना येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (MMLP) प्रकल्पाच्या उभारणीस गती देण्यासाठी जालना लोकसभा खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएचएलएमएल, विकास मलिक, प्रकल्प व्यवस्थापक, एनएचएलएमएल, जालना, मनोज निराळा, वरिष्ठ विभाग अभियंता (रेल्वे), जालना, मस्तान शहा, एमआयडीसी, जालना, संजय सराग, अधीक्षक अभियंता, महावितरण हे अधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. कल्याण काळे यांची प्रखर नाराजी
या बैठकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, कारण गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. अधिकाऱ्यांनी मार्च २०२५ अखेर प्रकल्प सुरू होईल, असे सांगितले असले तरी त्यास आणखी वेळ लागु शकतो असे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांबाबत चर्चा
जालना MMLP प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा व प्रगतीचा आढावा घेतला असता, पुढील मुद्दे समोर आले:
1. रेल्वे साइडिंग: २२ एकर जागेवर रेल्वे साइडिंग पूर्ण झाली असून, २९ मार्च २०२३ रोजी इंजिन चाचणी यशस्वी झाली आहे. मात्र, “इन-मोशन” वजन काटा अद्याप बसवायचा आहे.
2. पाणीपुरवठा: MIDC च्या जलवाहिनीचे रेल्वे लाईन क्रॉसिंगचे काम अपूर्ण आहे. ६० मीटर काम प्रलंबित असून, यासाठी १०.४७ लाख रुपये भरण्यासाठी NHLML ने संमती दिली आहे.
3. वीजपुरवठा: २०० KVA ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण झाले आहे, मात्र अंतिम कनेक्शन देण्याची प्रक्रिया बाकी आहे.
4. बाह्य रस्ता: NH-7521 (औरंगाबाद-जालना महामार्ग) ते MMLP जोडणाऱ्या रस्त्याचे १ किमी काम बाकी आहे.
जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडीसंदर्भात निर्णय
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी ड्रायपोर्टमुळे जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) बांधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्रकल्पास गती देण्यासाठी मंत्री महोदयांकडे बैठक ड्रायपोर्ट त्वरित सुरू व्हावा यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह मंत्री महोदयांकडे बैठक बोलावली जाईल, अशी माहिती खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली.
एमएमएलपी जालना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो कार्यान्वित झाल्यास मराठवाड्यातील औद्योगिक आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीस गती मिळेल. मात्र, काम रखडल्याने स्थानिक उद्योजक व व्यापारी वर्गात नाराजी आहे. खासदार डॉ. कल्याण काळे यांनी अधिकाऱ्यांना वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.