आशाताई बच्छाव
संघटनावाद बाजूला ठेवून समाजहितासाठी समाजबांधवांनी एकत्र यावे!
गुरु रविदास विश्व महापीठाचे प्रदेश सचिव गजानन गायकवाड यांचे आवाहन
वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: संत श्रेष्ठ गुरु रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गुरु रविदास विश्व महापीठच्या वतीने भव्य चर्मकार समाज मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे होते, तर उद्घाटन आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आणि लिडकॉम विभागीय व्यवस्थापक राऊत साहेब उपस्थित होते.
या मेळाव्यात समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये आमदार लक्ष्मण दादा घुमरे, चंद्रप्रकाश देगलूरकर, मीराताई शिंदे, व्यंकटराव दुधंबे आणि लॉ. डॉ. वसंतराव धाडवे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात समाजाच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजातील अन्याय, अडीअडचणी, तसेच सर्वांगीण विकासाबाबत विचारमंथन करण्यात आले. लिडकॉम योजनेबाबतही माहिती देण्यात आली. संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान घेण्यात आले. व्याख्यात्यांनी महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व विशद करत समाजाने त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संदेश दिला.
गुरु रविदास विश्व महापीठाचे राज्य सचिव गजानन गायकवाड यांनी संघटनावाद बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी शिवरायांच्या नावाचा अर्थ विशद करताना शिकण्याची, वागण्याची आणि जिंकण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी असे सांगितले.
कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणही झाले. शिक्षक गजानन डांगे यांनी स्वागतगीत सादर केले. मसलापेण येथील सरपंच पंढरी वानरे आणि म्हैराळडोह येथील सरपंच बबन सरदार यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
या भव्य मेळाव्याचे आयोजन गुरु रविदास विश्व महापीठाचे राज्य अध्यक्ष डॉ. वसंतराव धाडवे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. सूत्रसंचालन गजानन मुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष इंजि. विजय धुमाळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे राज्य संघटक संजय राजगुरू, विभागीय अध्यक्ष प्रा. वामनराव खंडारे, विभागीय सचिव बळवंत वानरे, जिल्हाध्यक्ष इंजी. विजय धुमाळे, जिल्हा सचिव नामदेव सरदार, जिल्हा उपाध्यक्ष रंजीत मालखेडे, तसेच नारायण करंगे, शंकर गायकवाड, किशोर वाघमारे, विठ्ठल राजगुरू, प्रशांत राजगुरू, संतोष राजगुरू, अमोल गोडवे, खुशाल इंगोले, महादेव ढोके, सौ. डॉ. प्रवीण धाडवे आणि सौ. चंचल खिराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संघटनावाद बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र येण्याचे आणि संत गुरु रविदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आले.