आशाताई बच्छाव
वाशीम मुद्रक संघातर्फे जीवनगौरव व कार्यगौरव पुरस्कार सोहळा संपन्न
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: मुद्रण व्यवसायाचा दीर्घ इतिहास असूनही आजही त्याचे महत्त्व अबाधित आहे, असे प्रतिपादन तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. जागतिक मुद्रण दिनानिमित्त 24 फेब्रुवारी रोजी वाशीम मुद्रक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ मुद्रकांना जीवनगौरव पुरस्कार तर मुद्रण व्यवसायात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या व्यक्तींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने झाली. त्यानंतर पीएसआय देविदास झुंगे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पाटणी कॉम्प्लेक्स येथे रॅलीचा समारोप झाला.
वाशीम मुद्रक संघातर्फे ज्येष्ठ मुद्रकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुद्रण व्यवसायात ३५ ते ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या मुद्रकांना कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला. मुद्रकांच्या पाल्यांपैकी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाटणी कॉम्प्लेक्स येथील रॉयल चिंतामणी हॉलमध्ये झालेल्या या समारंभात तहसीलदार निलेश पळसकर, वाशीम मुद्रक संघाचे अध्यक्ष मनोज बकाले, उपाध्यक्ष प्रदीप गोटे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी तहसीलदार पळसकर यांनी मुद्रण व्यवसायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकला आणि मुद्रकांच्या योगदानाची महती सांगितली.
कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष प्रदीप गोटे यांनी केले, तर आयोजन यशस्वी करण्यासाठी मुद्रक संघाचे अध्यक्ष मनोज बकाले, उपाध्यक्ष प्रदीप गोटे, सचिव गोपाल दांदडे, कोषाध्यक्ष नितीन गणमुखे आणि इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास मुद्रक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी उपस्थिती लाभली.