आशाताई बच्छाव
पानगळीचा शिशिर…अन भटकंती
सध्या रानोरान पानगळ सुरू आहे. उगाच एखाद्या दिवशी माळरानावर भटकंती करायला मन हट्ट करतं. त्याचा लाड पुरविण्यास पायीपायी निघायचं वाटेल त्या दिशेनं. पिवळी-तपकीरी उघडी बोडकी डोंगरं… वाळलेल्या, काही अर्धकच्च्या फिकट रंगांच्या पानांचा खच झाडांखाली साचलेला. झाडाखालून चालताना कुरुम कुरुम होणारा पानांच्या आवाज, त्या आवाजाने सळसळत जाणारे अधून मधून दिसणारे साप,सरडे अन सळया…. पांढऱ्याफटक उन्हामध्ये उंचावरच्या फांदीला वाऱ्याच्या तालावर डुलणार एखादंच पान. सुन्या सुन्या असल्या दुपारच्या पारी एकटं एकटं चालताना मनात चालणारी विचारांची तुफान गर्दी दूरवरून जाणाऱ्या महाकाय वाटोळीवर पाहून स्थिरावते. जमिनीला चिकटून असताना त्या वाटोळीत जवानीवानी चिक्कार जोश शिरलेला असतो. झाडांचा पालापाचोळा, कुण्या म्हातारीनं मांडवाच्या बाहेरच्या आडूवर वाळू घातलेली पालवं, कडब्याच्या वळईच्या वरच्या पेंडया ती वाटुळ सहजी त्यांची कानं पिरगाळुन त्यांना उचलते व उंच आसमंतात फेकते. वरवर गेल्यावर झिंगून झिंगून अवसान गळाल्यागत हळूच त्या साऱ्यांना सोडून देते.कोणताच थारा नसलेली बिचारी पालवं कुठंतरी बोराटी बाभळीवर अडकून पडतात.पण त्या पानांचं काय? कुणी वाली ना कुठला हक्काचा आसरा. दिवसभर हेलकाटत राहतात वर. हे सगळं निरखून पहात पहात मनातल्या विचारांचंही मनात काहूर तसंच उठतं. त्यात आगंतुकांचीच दाटी जास्त. ना शेंडा, ना बुड.. सौन्दडावर खोपच्यात बसलेल्या व्हल्याच्या घुघुटानं मन ताळ्यावर येतं मग. चालत चालत दूरवर एखादं हिरवं गच्च गोल गोल गोंदणीचं झाड दिसतं. जरा हायस वाटतं. त्यावेळी माहीत नसलेल्या ओढीची जाणीव होते. घशाला लागलेली तहानेची कोरड त्या झाडाखाली दिसणाऱ्या बिनगीकडे धाव घेते. थंडगार अमृत घटाघटा जर्मलच्या पेल्यानं पोटात उतरवलं की जरासं अंधारी आल्यासारखं वाटतं. डोळे मिचकावत मिचकावत दूरवर निरर्थक पाहिलं की जराशा वेळानं बरंही वाटतं मग. वर कुकुड कोंबड्याची फडफड अन खाली तेलमुंग्यांची रांग सवलीतून हाकलून द्यायलाच आहे की काय म्हणून नशिबाला दोनचार शिव्या देऊन पुन्हा चालायला लागायचं. चटकदार उन्हामुळे कानशिले गरम होतात तसं पावलं आपसूकच ओढ्याच्या काठाने चालायला लागतात. आटलेल्या ओढ्यात ठिगळा-ठिगळांनं पसरलेली मऊ काळीशार माती त्यावर अनवानी चालायला खुनावते. पण मोकाट मनाचं जास्त ऐकलं की पश्चाताप निश्चित! त्या मऊ मातीत चालताना त्याखाली लपलेला काठाळ बाभळीचा काटा आपल्या काळजाचा ठाव घेतो.तळपायापासून मेंदूपर्यंत प्रचंड झिणझिण्या आणणारा दाह आणि वेदना. कशाचेही भान त्याक्षणी राहत नाही,,झटक्यात जवळच्या पसरट आणि उन्हाने तापलेल्या तव्यासारख्या दगडावर कोलटेकणी बुड टेकवून खोल मासात रुतलेला काटा डोळ्यादेखत हाताने उपसावा लागतो यापेक्षा जीवनात कोणतं मोठ्ठ दुःख असणार. भळभळत्या छिद्रावर जखमजोडीचा पाला चोळून रस ओतला की जरा बरं वाटतं. नवी नवरीवानी हिरवा शालू घातलेलं जांभळीचं झाड अन त्याची थंडगार सावली पण आता गोड वाटतं नाही. आता मनसोक्त चालता तर येणारच नाही पण फिरायची हौस सुद्धा विरून गेली. वाटलं,,, कशाला मनछंदी वागावं आपण? कशाला सुखातली दुःखात घालायची…. बरं असतंय घरीच आपलं. रोज रोज उठायचं…खायचं…झोपायचं…. कुत्र्यगत जगायचं असंच…. खरंय का नाही…आ??
संतोष सकनूर
दिनांक 25 फेब्रुवारी 2025