आशाताई बच्छाव
बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा
पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यासह बसस्थानक-लक्कडकोट-भोकरदन नाका- छत्रपती संभाजीनगर या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालनाच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. आयुक्तांसाठी ओएस विजय फुलंब्रीकर यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पीसीएमचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, शहराध्यक्ष सुहास वैद्य, संदीप भाकरे, नरेंद्र जोगड आदींची उपस्थिती होती. प्रसंगी ओएस विजय फुलंब्रीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पीसीएम जालनाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मराठी वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी काढले. त्यानंतर मराठीतले पहिले मासिक ’दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. 1840 साली सुरू केले. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याच बरोबर विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. अनिष्ठ रुढी परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दर्पण दिन तथा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच बरोबर 20 फेब्रुवारी या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेशही महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारांचे आराध्य दैवत आहेत.