आशाताई बच्छाव
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला! बसने चिरडले; एक ठार , एक गंभीर ! सवणा फाट्याजवळची घटना
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
(बुलडाण:-चिखली तालुक्यातील घटना मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना भरधाव बसने मागून धडक दिल्याने एकजण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. चिखली ते बुलढाणा मार्गावर सवणा फाट्याजवळ ९ फेब्रुवारी रोजी सकाळी हा अपघात घडला. भंगार बसेसमुळे एका युवकाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
आलोक श्यामलाल शिंगणे (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय रमेश पट्टे (२६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलीहून जळगावकडे जाणाऱ्या एसटी बस (एमएच-२०-बीएल-१९३६) ने दोघांनाही धडक दिली. बुलढाण्याकडून येणाऱ्या वाहनाच्या तेजस्वी प्रकाशामुळे बसचालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. तर भंगार बस या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आलोक शिंगणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, तर जखमी अक्षय पट्टे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणावर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी एसटी बसगाड्यांची नियमित तपासणी आणि देखभाल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.