आशाताई बच्छाव
मद्यधुंद ड्रायव्हरची अंधाधुंद ड्रायव्हिंग; स्कुटीवरील मायलेकींना धडक, तरुणी ठार
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा
येथील त्रिशरण चौकात स्कुटीवरून पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या मायलेकीला महिंद्रा पीक अप गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुलगी ठार झाली. तर आई जखमी झाली आहे. आज दुपारी 12 वाजेदरम्यान हा भीषण अपघात घडला. मूळचे साखळी येथील छाया संदीप चौधरी (वय 55) आणि त्यांची 24 वर्षीय मुलगी स्नेहल पोस्ट ऑफिसच्या कामासाठी बुलढाण्याकडे येत असतांना त्यांना महिंद्रा पीक अप (एम. एच. 28 एबी 1188) गाडीने मागून उडविले. त्यात गाडी चालवणारी स्नेहल फेकली गेली आणि तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. आई सुद्धा खाली पडली. दोघींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. पण उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाला. पोलिसांनी महिंद्रा पिकअपचा ड्रायव्हर सतीश भास्कर बाहेकर (26 वर्षे) रा. किन्होळा यास तात्काळ ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शीनी गुड इव्हिनिंग सिटीला दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हर सतीश हा मद्यधुंद अवस्थेत होता. मृतक स्नेहल चे वडील संदीप चौधरी जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी पदावर नोकरी करतात. चौधरी कुटुंबीय चांडक लेआउट मध्ये वास्तव्यास आहे. स्नेहल बीएससी एग्रीकल्चरच्या पदवीसह उच्चशिक्षित होती. तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.