आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे
-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
गावातील 70 शेतकऱ्यांनी केली नोंदणी
जालना, (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):– रेशीम शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत तसेच अधिक उत्पादन मिळत असून जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आपला विकास साधावा. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करुन समृध्द व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
रेशीम कोषांना चांगले दर मिळण्यासाठी उपलब्ध करून देणार ड्रायर तसेच रेशीम धागा निर्मितीचे लहान युनिट दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी अंबड तालुक्यातील वडीकाळे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेशीम अभियान-25 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी एस.डी.पालवे, कृषी पर्यवेक्षक के.पी.कोकाटे, कृषी सहाय्यक जी. बी. उंडे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक शरद जगताप, सरपंच श्रीमती शिवनंदा भगवान ढेबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, पावसाळ्यात रेशीम कोषांना 250 ते 350 रुपये प्रति किलो दर प्राप्त होतो तर नोव्हेंबर पासून पुढील कालावधीत रेशीम कोषांना 500 ते 700 रुपये प्रति किलो असा वाढीव दर मिळतो. शेतकरी नैसर्गिक रित्या रेशीम कोषांची साठवण करु शकत नाही, परंतु रेशीम कोषांना उष्णता देऊन सुकविल्यास दीर्घ काळ साठविता येतात, यामुळे कमी दर असताना शेतकऱ्यांनी आपले कोष ड्राय करून साठवावे व चांगले दर मिळत असताना त्याची विक्री करावी.