आशाताई बच्छाव
_जिल्ह्यातील ओबीसींना न्याय मिळवून द्या_
_महामहीम राज्यपाल यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे साकडे_
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज असून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात वास्तव्यास आहे. राज्यात मानव विकास निर्देशांकात जिल्हा शेवटी आहे. केंद्र शासनाने गडचिरोलीला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती राज्याचे महामहीम राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केली आहे.
राज्यपाल महोदयांना दिलेल्या निवेदनानुसार, खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त पदांसाठी ओबीसींना १९ टक्के आरक्षण देऊन सरसकट पदभरतीची परवानगी देण्यात यावी, जिल्ह्यातील लघू व मध्यम सिंचन प्रकल्पासाठी वनहक्क अधिनियमाच्या अनुषंगाने सार्वजनिक हितासाठी असलेल्या तुरतुदीनुसार प्रकल्पांना वन जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, येथील कृषी महाविद्यालयात वाढत तुकडी निर्माण करून त्यात ओबीसींना ५० टक्के प्रवेश देण्यात यावे, पेसा अंतर्गत पदभरती झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली नॉन पेसा क्षेत्रात करू नये, ग्रामपंचायतींना स्वत:चे उत्पन्न स्त्रोत नसल्याने ‘सीएसआर’ निधी लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे, आकांक्षित जिल्हा म्हणून केंद्र सरकारच्या सूूचित असल्याने विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात, त्या सर्व योजना सर्व घटकांना लागू करण्यात यावे, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात पदभरती करतांना स्थानिकांना संधी देण्यात यावी, वनसंपदेतून मिळणाऱ्या फळ-फळांवर प्रक्रिया उद्योग सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैनगंगा व प्राणहिता नदी किनारपट्टीवर असून मागील काही वर्षापासून या जीवनदायी नद्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना श्राप ठरत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर स्थित गोसीखुर्द प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. परंतु हे नैसर्गिक नसल्यामुळे शासन स्तरावर याची दखल घेतली जात नाही व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. वारंवार होत असलेल्या नुकसानामुळे शेतकरी वर्ग उपासमारी व त्यांच्या होणाऱ्या नुकसानामुळे मुलांच्या शिक्षणावर खूप मोठे परिणाम होऊन त्यांना बेरोजगार व्हावे लागत आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प व सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसून नेहमी त्यांना या प्रकल्पामुळे नुकसान सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून या अनैसर्गिक होणाऱ्या नुकसानीची दखल घेऊन मागील पाच वर्षात ज्या शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर प्रतिवर्ष १ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी केले.
सिरोंचा तालुक्यातील मेडीगड्डा व भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या प्रकल्पाच्या पाण्यावर योग्य व्यवस्थापन झाल्यास जिल्ह्यातील होणारी पिक हाणी टाळता येऊ शकते, यावरही महामहीम राज्यपाल महोदयांशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी चर्चा केली.
त्याप्रसंगी भाजपा जेष्ठ नेते तथा माजी खासदार अशोकजी नेते व भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेश जी बारसागडे उपस्थित होते.