आशाताई बच्छाव
मराठेशाहीचा गौरवास्पद इतिहास जतन करण्यासाठी… ‘मोडी लिपी’ प्रशिक्षणवर्ग!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा संजय पन्हाळकर
बुलढाणा:- देऊळगाव राजा मराठेशाहीचा गौरवास्पद इतिहास जतन करण्यासाठी मोडी तज्ञांची गरज असून मोडी लिपीचे युवा पिढीला ज्ञान व्हावे व त्यांनी इतिहास आणि संस्कृतीचे संवर्धन करावे या उद्देशाने येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि इतिहास विभाग, श्री व्यंकटेश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 10 दिवसीय मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि. 19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान
करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये यादव काळापासून मोडी लिपीची सुरुवात झाली आणि हेमाद्रीपंत यांना या लिपीचे जनक मानले जाते. न मोडता न थांबता अत्यंत जलद गतीने लिहिल्या जाणा-या या लिपीस ‘मोडी लिपी’ असे म्हटले जाते. आजच्या स्टेनोग्राफरची जशी सांकेतिक लिपी आहे, असेच स्वरूप तत्काळात या लिपीला होते. यादव काळात सुरु झालेल्या या लिपीचा खरा प्रचार आणि प्रसार सुरु झाला तो शिवकाळापासून ! म्हणूनच आज शिवकाळ व पेशवाईतील मोडी लिपीत असलेली कोट्यावधी कागदपत्रे उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी आणि मराठ्यांचा अप्रकाशित असलेला इतिहास प्रकाशात आणण्यासाठी मोडी लिपीचा
प्रसार होणे गरजेचे आहे. शिवाय मोडी लिपीचे जतन
व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहास संशोधनाची दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशांनी सदर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग सर्वांसाठी खुले असून विद्यार्थ्यांसाठी 300 तर इतरांसाठी 600 रुपये प्रवेश शुल्क आहे. प्रथम येणा- यास प्राधान्य यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाषा संवर्धन आणि इतिहास संशोधनास चालना देणा-या या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांनी केले आहे.