आशाताई बच्छाव
मौजपुरी येथे जेष्ठ नागरीक आरोग्य तपासणी सह विविध योजनेचे विशेष मार्गदर्शन आणि जनजागृती शिबीर; 253 लाभार्थ्यांना दिला लाभ
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –तालुक्यातील मौजपुरी येथे सामाजिक न्याय विभाग जालना, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि मौजपुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यत जेष्ठ आणि वयोवृध्द नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, निराधार योजनेचे विशेष मार्गदर्शन व जनजागृती शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अरुण एम., गटविकास अधिकारी संदीप पवार, सरपंच बद्रीनारायण भसांडे, उप सरपंच सत्यनाराण ढोकळे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी बळप, उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ. करुणा मोरे, सचिव अच्युत मोरे, रामदास गायकवाड, सचिन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान या आरोग्य तपासणी शिबीरात विरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडीकल ऑफिसर डॉ. सुरज राठोड, आरोग्य सेवक आर.टी. जैवाळ, आरोग्य सहाय्यक व्ही. एच. लाड, परिचारिका एस. पी. ढिल्पे यांनी वयोवृध्द व जेष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी केली, त्यानंतर शासनाच्या वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, निराधार योजनेसाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र गावातच उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच आयोजन उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वयोवृद्धांचे तीर्थदर्शन, वयोश्री योजनेचे अर्ज देखील भरुन देण्यात आले. यावेळी गावातील उपस्थितांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगून त्या बाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देणे या उद्देशाने संस्थेच्या वतीने हे विशेष शिबीर घेण्यात आले.