आशाताई बच्छाव
भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना मिळणार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश
देसाईगंज/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- आरमोरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने भोई,ढिवर व गोपाळ या भटक्या जमातीचे वास्तव आहे.अनुसूचित जाती करीता रमाई आवास योजना, अनुसूचित जमाती करीता शबरी आवास योजना, भटक्या जमातीतील धनगर समाजाला अहिल्याबाई होळकर घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेतील राहीलेल्या ओबीसी समाजाकरीता मोदी आवास योजना राबविण्यात येत आहे. परंतु भटक्या जमाती ब प्रवर्गात मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असलेले भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिक हक्काच्या घरापासून वंचित होते. ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असुन शासकीय स्तरावरुन तसे परिपत्रक काढण्यात आल्याने आमदार गजबे यांचे आभार मानले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या भोई,ढिवर व गोपाळ समाजातील नागरीकांना हक्काचे घर मिळावे या करीता इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येते.सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी आरमोरी तालुक्यात ५२,देसाईगंज तालुक्यात १००,कुरखेडा तालुक्यात २३ लाभार्थ्यांसह जिल्ह्यातील एकुण ४४० नागरिकांनी पंचायत समिती मार्फत अर्ज सादर केले होते. परंतु जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.ही बाब निदर्शनास येताच आमदार कृष्णा गजबे यांनी सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली यांना प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सुचना केली.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे अध्यक्षते खाली जिल्हास्तरीय समितीच्या प्रशासकीय मान्यता आदेशासह पंचायत समिती निहाय एकुण ४४० लाभार्थ्यांची यादी
शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आली. सदर प्रस्तावास मंजुरी देण्याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांची भेट घेऊन सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याची पत्राद्वारे विनंती केली. त्यानुसार मंत्री महोदयांनी सदर पत्रावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव यांना मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश दिले. त्या अनुषंगाने शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शासन निर्णय क्रमांक:यचमु-२०२४/प्र.क्र १०७/योजना-५ दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भोई, ढिवर व गोपाळ समाजातील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेतुन हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्याने आमदार गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांचेही आभार मानले.