आशाताई बच्छाव
कॉंग्रेसच्या पोटात एक,ओठात एक –सरसेनानीआनंदराज आंबेडकर
“मुंबई (संजीव भांबोरे )कॉंग्रेस हा पक्ष कधीही आरक्षणाच्या बाजूने नव्हता. या देशामध्ये एस्सी आणि एसटी समूहांना जे आरक्षण मिळाले ते केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाले आहे. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 340 कलमानुसार ओबीसींना सुद्धा आरक्षण दिले होते; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कॉंग्रेसने नव्हे तर व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात करण्यात आली. एवढेच नाही तर कॉंग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार सुद्धा देऊ शकली नाही. भारतरत्न हा पुरस्कार व संसदेत बाबासाहेबांचे तैलचित्र लावणे यासाठी व्ही. पी. सिंग सरकार केंद्राच्या सत्तेत यावे लागले. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करतात; मात्र बाबासाहेबांचा योग्य तो सन्मान करीत नाहीत.” असे उद्गार रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काढले. ते डॉ.आंबेडकर भवन दादर मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, “एस्सी, एसटी, ओबीसी यांचे आरक्षण संपवणे हीच कॉंग्रेसची मानसिकता आहे. ही मानसिकता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केलेल्या आरक्षणविरोथी वक्तव्यावरून स्पष्ट होते.” मंडल आयोगाचा अहवाल धूळ खात ठेवणे यामागे ओबीसींना आरक्षण न देण्याचा कॉंग्रेसचा कुटील डाव होता; असे सांगून कॉंग्रेसचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत अशी पुष्टी त्यांनी जोडली. एस्सी एसटी ओबीसींना सावध करताना त्यांनी आवाहन की, कॉंग्रेसवाले तोंडाने काहीही बोलत असले तरी आतापर्यंत संविधानात शंभर वेळा बदल करण्यात आला तेव्हा हे काय करीत होते? शेवटी सर सेनानी आनंदराज आंबेडकरांनी आरक्षणविरोथी पक्षांना आव्हान दिले की, आरक्षण संपवण्याच्या गप्पा मारणाऱ्या पक्षांना धडा शिकवल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले, महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य विनोद काळे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष गाडे, मुंबई युवाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.