Home रायगड गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा CM यांचा मानस

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा CM यांचा मानस

19
0

आशाताई बच्छाव

1000687320.jpg

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा CM यांचा मानस

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी. वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री. घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रूपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम 60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे.

या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे, हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.

या तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली. शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले.

Previous articleसन्मित्र ट्रक वाहतूक संघ (मुरुड- अलिबाग) अध्यक्षपदी प्रशांत नाईक यांची बिनविरोध फेरनिवड
Next articleमुस्लिम बांधवांचा शेकापला दे धक्का ! शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here