🛑 पुणे अग्रभागी कोणते ठिकाण असेल, तर ते आहे स्वारगेट 🛑

0
25

🛑 पुणे अग्रभागी कोणते ठिकाण असेल, तर ते आहे स्वारगेट 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे 31 जुलै :⭕ पुण्याचे आकर्षण नाही, पुणे पाहिले नाही किंवा पुण्याची माहिती नाही, अशी माणसं किमान महाराष्ट्रात तरी सापडणे कठीण. पुणे हे असे शहर आहे, ज्याची किमान जुजबी माहिती प्रत्येक मराठी माणसाला असते. या माहितीमध्ये सर्वांत अग्रभागी कोणते ठिकाण असेल, तर ते आहे स्वारगेट!

पुण्यात प्रवेश करताना स्वारगेट हे नाव चुकत नाही; तसेच तो शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने टाळता येत नाही. राज्यातील कोणत्याही बस स्टँडला स्वारगेटसारखे वलय नाही. स्वारगेट येथे एस. टी. महामंडळाचे पुणे विभागीय कार्यालय; तसेच जवळ पीएमपीचा डेपो आहे. जेधे चौकात साकारल्या जाणाऱ्या भव्य प्रकल्पामध्ये एसटी व पीएमपी बस स्थानक आणि मेट्रो असे वाहतुकीचे जाळे निर्माण होणार आहे.

स्वारगेटची माहिती घेण्यासाठी इतिहासात डोकवावे लागते. आधुनिक वाहने नव्हती, तेव्हाही स्वारगेट होते. ब्रिटिश काळात येथे घोड्यांचा तबेला आणि घोडेस्वार असत. त्यामुळे या ठिकाणाला स्वारांचे गेट म्हणून स्वारगेट म्हटले जाऊ लागले. दोन भाषेतील शब्दांपासून आकारास आलेला हा शब्द रूढ झाला. शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून होता, तेव्हा तिथे छावणीचे स्वरूप आले होते. कात्रजच्या घाटाकडे जाऊ लागलो, की जिथे मुख्य चौकी होती ते म्हणजे आजचे स्वारगेट असे म्हटले जाते. पण याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे इतिहास अभ्यासक मंदार लवाटे स्पष्ट करतात. ब्रिटिश काळात कोतवाली बंद होऊन पोलिस व्यवस्था आकारास आली आणि या ठिकाणाला गेट व पुढे स्वारगेट म्हटले जाऊ लागले. स्वारगेटप्रमाणे रामोशी गेट, म्हसोबा गेट, पुलगेट, पेरुगेट ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

‘स्वारगेट व इतर आगाराच्या मिळून सतराशे गाड्या रोज येथून धावतात,’ असे स्वारगेट बस स्थानकाचे प्रमुख एस. एस. शिंदे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये तेव्हाच्या मुंबई इलाक्यात ‘पुणे-नगर’ ही पहिली एस. टी. बस धावली. तेव्हा गाड्या पालिकेपासून निघत. १९४९-५० च्या दरम्यान स्वारगेट बस स्टँड अस्तित्वात आले. दहा वर्षांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि एसटीची भरभराट झाली, अशी आठवण एसटीतील निवृत्त अधिकारी हनुमंत काळे यांनी सांगितली.

१७३० पर्यंत पुण्यात पेशवे नव्हते. शनिवारवाडा बांधल्यानंतर पेशवे राहायला आले आणि शहराचा विस्तार झाला. माधवराव पेशव्यांनी ठिकठिकाणी चौकी सुरू केली. त्यास ‘कोतवाल चावडी’ म्हटले जाई. पुढे ब्रिटिश काळात घोडे आणि घोडेस्वार थांबतात ते ठिकाण स्वारगेट म्हणून ओळखले जाऊ लागले.⭕

Previous article🛑 विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आयटीआय प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू 🛑
Next article🛑 *छावा प्रतिष्ठान रत्नागिरी…..! तर्फे स्वच्छता मोहीम* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here