प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास कुणीही अधिकारापासून वंचित राहणार नाही

0
64

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210131-WA0005.jpg

 

प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास
कुणीही अधिकारापासून वंचित राहणार नाही

जिल्हा न्यायाधीश ए.एस.गांधी

_मुंगसे येथे कायदेविषयक जाणीव जागृती शिबिर संपन्न_

मालेगाव, दि. 31 (उमाका वृत्तसेवा): सर्वांसाठी न्याय व न्याय आपल्या दारी ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास कुणीही अधिकारापासून वंचित राहणार नाही. तळागाळातील नागरिकांमध्ये शासकीय योजनांची जाणीव जागृती झाल्यास आयोजित शिबिराचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा वर्ग-1 चे न्यायाधीश ए.एस.गांधी यांनी आज केले.

गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यातील मुंगसे येथे तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात न्यायाधीश श्री.गांधी बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-2 डी.डी. कुरूलकर, जिल्हा न्यायाधीश-3 डी.वाय.गौड, सहदिवाणी न्यायाधीश एस.जी.लांडगे, वाय.पी.पुजारी, एन.एन.धेंड, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.के.बच्छाव, सचिव ॲड. किशोर त्रिभुवन, चैतन्य जाधव, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी भास्कर जाधव, किरण शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका प्रशासनामार्फत चांगले काम सुरू असल्याचे सांगतांना न्यायाधीश श्री.गांधी म्हणाले, तालुका विधी सेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. आपल्या न्याय हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरण समितीची स्थापना झाली असून या माध्यमातून कुणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही हेच उद्दिष्ट समोर ठेवून समितीचे कामकाज सुरू आहे. ज्या नागरिकांना काही अडचणी असतील त्यांनी थेट समितीकडे दाद मागावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना सेवा देणे हा त्यांचा अधिकार : विजयानंद शर्मा

नागरिकांना सर्व सेवा देणे हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, आणि आपल्या न्याय हक्काची जाणीव जागृतीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अभिनंदनीय असून या उपक्रमास शुभेच्छा देताना महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती सांगतांना प्रांताधिकारी श्री.शर्मा म्‍हणाले, शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे ही वेळेत प्राप्त करून घेतल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. महसुली कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी व सूचनांचे स्वागत असल्याचे सांगत, त्यांनी यावेळी उपस्थितांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधा पत्रिकेसह आवश्यक दाखल्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप केले.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी स्वतंत्र कक्ष : गोकुळ अहिरे

सर्व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली देताना शासकीय योजना आपल्या दारी ही संकल्पना वंचितांना प्रवाहात आणण्यासाठी प्रवाही ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना तालुका कृषी अधिकारी श्री. अहिरे म्हणाले, शेतकरी राजाच्या सन्मानासाठी कृषी मंत्र्यांनी स्वतंत्र शेतकरी सन्मान कक्षाची स्थापना प्रत्येक कृषी कार्यालयात केली आहे. शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना महाडीबीटी पोर्टलव्दारे एकाच अर्जाने विविध योजनांचा लाभ यापुढे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये संबंधित गावाच्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या फलकाचे वितरण करण्यात येत असून यावेळी मुंगसे गावाच्या फलकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर वैयक्तीक जमीन आरोग्य प्रत्रिकेचे वितरणही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पंचायत समितीचे 11 विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत : जितेंद्र देवरे

नागरिकांच्या सेवेसाठी पंचायत समिती मार्फत विविध प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगतांना गट विकास अधिकारी श्री. देवरे म्हणाले, 11 विभागांमार्फत नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचे कामकाज पंचायत समितीमार्फत अविरत सुरू असते. यात आरोग्य, महिला बालकल्याण, शिक्षण, घरकुल योजना, वैयक्तीक लाभाच्या योजनांसह महिला बचत गट कार्यान्वित असल्याचे सांगतांना या सर्व विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची तपशीलवार माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

सुरवातील सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कायदेविषयक शिबिराच्या आयोजनाचा उद्देश वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बच्छाव यांनी प्रस्तावनेतून स्पष्ट केला, तर कुणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही यासाठी विधी सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. गरिबी निर्मूलनासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विधी सेवा समितीची असल्याने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून आज मुंगसे गावात आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनंदनास पात्र असल्याची भावना सह दिवाणी न्यायाधीश श्री.पुजारी व श्री.धेंड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. सुनील बच्छाव यांनी आभार मानले

Previous articleनिलेवाडी गावातील रस्त्याला १० लाखाचा निधी
Next articleरोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here