नांदेड जिल्हा भाजपा चा बालेकिल्ला बनविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी आक्रमक पणे काम करावे – खा. चिखलीकर

0
54

नांदेड जिल्हा भाजपा चा बालेकिल्ला बनविण्यासाठी
पदाधिकार्‍यांनी आक्रमक पणे काम करावे – खा. चिखलीकर

नांदेड, दि.२३ – राजेश एन भांगे

आगामी एक वर्षाच्या कार्य काळात नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनविण्यासाठी पक्ष संघटनेतील नुतन पदाधिकार्‍यांनी तळा गाळातील लोकां पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पोंहचविण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाच्या नेत्यांवर बिनबुड्याचे खालच्या पातळीवर आरोप करणार्‍या विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी पदाधिकार्‍यांनी आक्रमकता दाखविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड लोकसभा मतदसंघाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. खा.चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी ग्रामीण व शहर युवा मोर्चा, ओबीसी सेल, ग्रामीण महिला आघाडी, उद्योग आघाडीची कार्यकारिणी जाहिर करुन खा.चिखलीकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, शहर महानगराध्यक्ष प्रविण साले, आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, आ. भिमराव केराम, जिल्हा संघटन सरचिटणीस गंगाधर जोशी, ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर देशमुख, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय पाटील घोगरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष बाबुराव केंद्रे, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्ररेखा गोरे, प्रदेश ओबीसीचे सदस्य माणिकराव लोहगांवे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगांवकर, उद्योग आघाडीचे महानगराध्यक्ष शैलेस कर्‍हाळे, भाजपाचे उपाध्यक्ष माहूरचे महंत श्यामगिर भारती महाराज, शिवराज पाटील माळेगांवकर, भारतीताई पाटील, विजय गंभीरे, भाजपा जिल्हा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे आदिंची उपस्थिती होती.
खा. चिखलीकर म्हणाले, शहर व ग्रामीण युवा मोर्चाकडून पक्षाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. विरोधकांनी भाजपा नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करणार्‍यांना आक्रमकपणे सडेतोड उत्तर देण्याची धमक पदाधिकार्‍यांत असली पाहिजे. भाजपा पक्षाच्या वातावरण निर्मितीची जबाबदारी युवा मोर्चावर आहे. गटा-तटाच्या राजकारणात युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी न पडता पक्ष वाढविण्यासाठी आपली शक्तीपणाला लावावी. ज्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाधिकार्‍यांकडून पक्ष संघटनेचे काम होत नसल्याचे दिसताच त्यांना घरी बसविले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी मनात कोणतेही संकोच न बाळगता जिद्दीने भाजपा महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करावे. ज्या ठिकाणी महिला आघाडीला अडचण येत असेल त्यावेळी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांना आवाज द्या. तुमच्या मदतीसाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. पक्ष संघटनेतील आपल्या बहिण-भावाचे नाते बळकट करुन जिल्ह्यात भाजपा हा एक नंबरचा पक्ष झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन खा.चिखलीकर यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात भाजपा ओबीसी सेलचे जाळे निर्माण करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. उद्योजक आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जास्तीत जास्त उद्योजक, व्यापार्‍यांना भाजपा पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचे काम आगामी काळात झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देशात 11 कोटी सदस्य असलेला एकमेव भाजपा पक्ष आहे. पक्षसंघटनेत मनाप्रमाणे पद न मिळाल्यास नाराज न होता पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केल्यास पक्षश्रेष्ठीं तुमच्या कामाची दखल घेवून आगामी काळात योग्य संधी दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात भाजपाची सत्ता नसतानाही पक्षसंघटनेत काम करण्यासाठी फार मोठी चुरश निर्माण झाली आहे. आगामी काळात राज्यात भाजपाची सत्ता आल्यास पक्षाचे आणखी वेगळे चित्र दिसणार आहे. बिनबुड्याचे आरोप करणार्‍या विरोधकांवर सडेतोड उत्तर देण्याची धमक प्रत्येक सेलच्या पदाधिकार्‍यांत निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षी आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, आ.भिमराव केराम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी नविनर्वाचित पदाधिकार्‍यांना खासदार-आमदारांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here