🛑 गुंठा मंत्री (भाऊ)……!

0
48

🛑 गुंठा मंत्री (भाऊ)……! येती घरा 🛑
✍️ विशेष बातमी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विशेष बातमी ⭕ घरमालकाकडं येणाऱ्या एका गुंठांमंत्र्याची अशीच ओळख झालेली. रोज येता जाता तो हात करत होता. म्हणून मीही हात करू लागलो. चौकात भेटला की ओळख द्यायचा. चहा प्या म्हणायचा. मोठ्या लोकांची ओळख असलेली बरी, म्हणून मग मीही कधी-मधी त्याच्यासोबत चहा घ्यायचो.

त्याच्यासोबत चहा पेताना उगीचच आपणही मोठ्या बापाचे आहोत, असं वाटायचं. त्याच्या गळ्यात वीस पंचवीस तोळ्याचा गोफ, दोन्ही हातातल्या सातआठ बोटात पाच पाच तोळ्याच्या अंगठ्या. मनगटावर चार-पाच इंचाचं ब्रेसलेट. एवढंच कमी का काय, त्याच्या गॉगलची फ्रेमही सोन्याची. त्याला फिरायला फॉर्च्युनर, त्याचा बूट बॅंडेड, त्याचे कपडे ब्रॅंडेड. सगळं कसं एकदम रुबाबात.

वडिलांनी घाम गाळून कमावलेल्या दहा एकरातली एक एकर विकून त्यानं हा रुबाब अंगावर चढवला होता. परंतु, ते काही का असेना, आत्ताच्या घडीला भाऊचा नाद कुणीच करायचा नव्हता. भाऊ चौकात आला की किमान वीस जणांना चहा पाजत होता. त्याच्यासोबत नेहमी पाच सहा टाळकी असतात. रात्रीच्या टायमाला जो भाऊसोबत फिरेल त्याला चिकन बिर्याणी आणि दारू ठरलेली.

आपण कष्टानं कमावलेला पैसा पोरगा पाण्यासारखा उडवतोय याची बापाला तळतळ वाटत असेल, मात्र भाऊ आमच्या परिसरातला वाघ झाला होता. नेमकं सकाळी सकाळी मी पाणी भरत असताना हा वाघ घरमालकाच्या ऑफिसमधी आला अन् मला दिसला. नमस्कार चमत्कार झाला. मी म्हणालो, ‘भाऊ, या की एकदा गरिबाच्या घरी चहाला.’ भाऊ म्हणाला, ‘शून्य मिंटात हितलं काम उराकतो अन्‌ तुमच्याकडं येतो.’ मी पटकन पाण्याचे दोन हांडे डोक्‍यावर घेतले अन्‌ घरात गेलो. पटापट घर झाडलं. बायकोला चहा ठेवायला लावला. तोच भाऊ दारात हजर.

लेक म्हणाला, ‘पप्पा हे तुमचे फ्रेंड आहेत का?’ मी होकार दिला. भाऊ खुर्चीवर बसले. लेकाला भाऊंच्या अवताराचं मोठं नवलं वाटलं. इथं आपली मम्मी गळ्यात मंगळसूत्र घालत नाही अन्‌ भारदस्त मिशीवाल्या धिप्पाड काळ्या गडीमाणसानं गळ्यात काय घातलंय हे लेकाला समजत नव्हतं. नेमकी लेकाची नजर भाऊंच्या हातावर गेली अन् लेक म्हणाला, ‘पप्पा तुमच्या फ्रेंडनं बांगड्या का घातल्यात?’ ठसकाच लागला. काय बोलावं कळाना. भाऊंसोबत आलेल्या चार दोन टाळक्‍यातली दोघ तिघं गुपचूप हसली. मलाही हासू आलेलं, पण भाऊंसमोर कसं हसणार? मी लेकाला बाहेर खेळायला पाठवलं. तर लेकं दोन चार मित्रमैत्रिणी घेऊन आला अन् भाऊंच्या हातातल्या बांगड्या दाखवू लागला. चिलीपिली दात काढून हसत होती. तसा भाऊंनी खिशातला आयफोन कानाला लावला अन् ‘आलो दादा आलो, शून्य मिंटात चौकात आलो. तिथंच थांबा,’ असं म्हणत जागेवर उभे राहिले. ‘जाऊ का शेठ? आमदारसाहेब आल्यात चौकात,’ असं म्हणत भाऊंनी नमस्कार केला अन्‌ चहा न पेता कल्टी मारली.

मी लेकाकडं पाहत होतो. लेक हसत होता. बायको हसत होती. लेकाचे मित्रमैत्रिणीही हसत होते. मी मात्र सुन्न झालेलो. भाऊ आता चौकातही ओळख देणार नाही याची खंत मनात सलत होती…⭕

Previous article*सटाणा शहरात मनसेचा मोर्चा*
Next article🛑 *उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here