आशाताई बच्छाव
मायेचा निखळ मुर्तीमंत झरा,
माझी आई लक्ष्मीबाई राऊत
(सतरावा पुण्यस्मरण दिन)
आज २५ जानेवारी २०२६ माझी आई लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील यांचा सतरावा स्मृती पुण्यस्मरणदिन! मायेचा निखळ प्रेमळ मुर्तीमंत झरा म्हणून माझ्या आईची असलेली ओळख आजही वयोवृद्ध नागरिकात चर्चीली जाते, हे विशेष.माझ्या आईचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या कौळाणे (नि.) या गावी दगूबाई दगडू बोरसे आणि दगडू नथू बोरसे या दाम्पत्याच्या पोटी झाला.माझ्या आईच्या मामाचे गाव कौळाणे शेजारील व-हाणे हे असून,तेथील रतन शेवाळे हे माझ्या आईच्या मामाच्या मुलांचे नाव.अगदी अक्षर ओळखही नसलेली माझी आई अडाणी नक्कीच होती.मात्र व्यावहारिक ज्ञान हे तिला जन्मजात लाभलेले होते.धर्मभोळया असलेल्या माझ्या आईचा विवाह पुढे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या ब्राम्हणी गावातील रखमाजी भाऊसाहेब राऊत पाटील यांचेसोबत झाला.माझे वडील स्वर्गीय रखमाजी भाऊसाहेब राऊत पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टिळकवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मध्ये शासकीय नोकरीत होते.माझ्या अडाणी असलेल्या परंतु जन्मजात बुध्दीमान असलेल्या आईने लक्ष्मीबाई (अक्का) यांनी आपला संसार सुखी समाधानी व नीट नेटका करून दाखविला.माझा जन्म सन १९७१ साली दिवाळीच्या दिवशी झाला.त्याअगोदर माझ्यापेक्षा मोठी असणारी दोन भावंडे रविंद्र आणि महेंद्र यांचे ऐन तारुण्यातच निधन झाले.व माझ्या आई वडिलांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला.अन तशातच माझा जन्म झाल्याने आईने व वडीलांनी स्वतः ला सावरले.दिवसामागून दिवस जात होते.काळ कुणाचीही वाट बघत नाही.आणि पुन्हा एकदा मी अवघा लहानसा असताना माझ्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला .मी दिड वर्षांचा असतानाच माझ्या वडीलांचे निधन झाले अन् तेव्हापासून परत माझ्या आईच्या (अक्काच्या) जीवनात संघर्षमय फरफट सुरू झाली.मला आई तिच्या माहेरी कौळाणे (निं) गावी घेऊन आली.माझे बालपण, शिक्षण,सगळं याच भागात झाले.स्वतच्या पोटाला चिमटा देत माझे संगोपन व पालनपोषण करून मला माझ्या आईने लहानाचा मोठा केले.प्रसंगी स्वतः लोकांच्या शेतात काबाडकष्ट करून माझे जीवन फुलविण्यासाठी माझ्या आईने स्वतः च्या जीवाचा त्याग केला आपले जीवन संपूर्णपणे माझ्यासाठी समर्पित केले.आणि मला शिक्षण देऊन उभे केले.माझी आई एक देवभोळी म्हणून आजही संपूर्ण कौळाणेकरांना ज्ञात आहे.घरात उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल पण गावातील हनुमान व महादेव मंदिरात न चुकता दररोज पहाटे व सायंकाळी देवपुजा ही झालीच पाहिजे असा माझ्या आईचा शिरस्ता होता.माझ्या आईच्या या देवपुजा व धार्मिक संस्कारामुळे आजही कित्येक अशा मुली व मुलं आहेत की,ते धार्मिकतेकडे ओढले जाऊन सुसंस्कारित झालेले आहेत.घरची गरीबी जरूर होती.मात्र माझ्या आईने मला ती कधीच जाणवू दिली नाही.आज मी संपूर्ण महाराष्ट्रात स्वतः चे नाव कमावून नावलौकिक मिळविला आहे.पण या सगळ्या गोष्टीमागे अनमोल त्याग माझी आई (अक्काचा) लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील यांचाच आहे.आज माझ्या आईला या नश्वर भुतलावरील आपला जीवन प्रवास संपवून सतरा वर्षांचा काळ लोटला गेला आहे.पण…आजही पावलोपावली आणि रोजच आईची आठवण आली नाही असा एकही क्षण जात नाही.माझे आयुष्य घडविणा-या माझ्या आईस आजच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून माझी शब्दरूपी श्रध्दांजली अर्पित करतो. “ओम शांती!”
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र






