
*सततच्या पावसाने पिकांचे नुकसान*
_हवामान खात्याच्या मार्गदर्शनाचा आभाव_
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*देवळा*: देवळा तालुक्यात जून ते सप्टेंबर पर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मुंगसह पोळ कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतात पाण्याचा निचरा न झाल्याने उन्हाळी कांद्याच्या रोपांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने बुरशी रोगाचा प्रादुर्भाव व तीव्र ऊन यामुळे उन्हाळ कांदा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकटे कमी होण्यास काही तयार नाही. गेल्या काही वर्षात ओला दुष्काळाने खरीप तर कोरडा दुष्काळाने रब्बी पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकरी करत आला आहे. यावर्षी पावसाळ्याची सुरुवात चांगली होऊन खरिपाची पेरणी झाली असली तरी त्यानंतर सतत होत असलेल्या जोरदार पावसाने बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने मर रोगाचे प्रमाणही वाढले. खरीप हंगामातील पोळ कांदा , रब्बी हंगामातील लागवड करण्यासाठी उन्हाळ कांदा रोप, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कोथंबीर आदी पिकांचे बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात सापडले आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी अगोदरच अधिकचा उत्पादन खर्च झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
उन्हाळ कांदा रोप पिवळी होऊन मर रोगाचे बळी पडत आहेत. त्यामुळे आगामी उन्हाळ कांदा लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च आज कांदा बी करिता होत आहे. परिणामी लागवडीसह उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच खरिपातील कापणीला आलेले पिकं मका, सोयाबीन, बाजरी, मुंगसह टोमॅटो, कोबी, फ्लॉवर कोथंबीर आदी पिकांचे काढणीचे नियोजन करण्यासाठी हवामान खात्याकडून हवे ते मार्गदर्शन मिळत नसल्याने कापणी नियोजन करणे सतत अवघड होतं चालले असल्याची खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. या कापणी नियोजन व हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाने अचूक मार्गदर्शन सूचना नसल्याने कापून पडलेला मका, सोयाबीन, बाजरी पिकांना आता कोंब येऊ लागले असल्याने शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.